खळबळजनक ! गेम खेळताना मोबाईलचा स्फोट होऊन युवकाचा डोळा निकामी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – गेम खेळताना मोबाईल गरम झाल्याने त्याचा स्फोट झाला. त्यात मोबाईलचा तुकडा डोळ्यात घुसल्याने युवकाचा डोळा निकामी झाल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात समोर आला आहे.

अमोल दत्तात्रय पाटील (वय १६) असे युवकाचे नाव आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अमोल पाटील हा कागल तालुक्यातील उंदवाडी येथे राहण्यास आहे. त्याने नुकतीच १० वीची परीक्षा दिली आहे. आता १० वीचा निकाल लागणार आहे. सुट्टी असल्याने त्याला जादा क्लासेससाठी प्रवेश देण्यात आला आहे. परंतु बुधवारी सकाळी घरातील सर्वजण भैरीचे पठार येथे शेतात गेले होते. त्यावेळी सकाळी १० च्या सुमारास अमोलने जनावरांना चारा टाकला. आणि मोबाईलवर तेथेच गेम खेळत बसला. त्यावेळी मोबाईल गरम होऊन त्याचा स्फोट झाला. या स्फोटात त्याच्या मोबाईलमधील एक लांब तुकडा त्याच्या डाव्या डोळ्यात घुसला. त्यानंतर त्याला वेदना होत असल्याने तो शेजाऱ्यांनी वडिलांना कळविले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या डोळ्यातील तुकडा शस्त्रक्रिया करून काढला.परंतु त्याचा डोळा निकामी झाल्याचे सांगितले. मोबाईल कंपनीवर दावा दाखल करणार असल्याचे त्याच्या वडीलांनी सांगितले.

You might also like