बंगळूरूमध्ये आमदाराच्या घराबाहेर स्फोट, एकाचा मृत्यू

बंगळूरू : वृत्तसंस्था – कर्नाटकची राजधानी बंगळूरूमध्ये स्थानिक आमदाराच्या घराबाहेर आज स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. बंगळूरूमधील राजराजेश्वरी नगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

स्थानिक आमदार मुनिरत्ना राजराजेश्वरी यांच्या घराबाहेर आज सकाळी स्फोट झाला. आमदाराच्या घरासमोर स्फोट झाल्याची बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी श्वान पथक पोहचले असून परिसराची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

घटना घडली त्यावेळी आमदार त्यांच्या घरामध्ये होते की नाही हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेविषयी बंगळूरू पोलीस आयुक्त टी सुनील कुमार यांनी सांगितले, आज सकाळी ९ वाजून २० मिनीटांनी हा स्फोट झाला. या स्फोटात व्यंकटेश नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनास्थळी फॉरेन्सीक पथक दाखल झाले असून हा स्फोट नेमका कशाचा होता याचा तपास करीत आहेत.