पुण्यातील एअर फोर्स शाळेत हॅन्डग्रेनेड सदृश्य वस्तु (जिवंत) सापडल्याने प्रचंड खळबळ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन :  पुण्यातील एअर फोर्स शाळेच्या मैदानावर हॅन्डग्रेनेड सदृश्य वस्तु सापडल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह वायु सेनेतील अधिकार्‍यांची भंबेरी उडाली आहे. याबाबत शहर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता त्यांनी विमानतळ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी नियंत्रण कक्षाकडे मदतीची मागणी केली होती आणि त्याप्रमाणे त्यांना मदत पाठविण्यात आल्याचे सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, विमानतळ परिसरात एअर फोर्सची शाळा आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शाळेतील मुले शाळेच्या मैदानावर खेळण्यासाठी गेली होती. त्यापैकी काही विद्यार्थ्यांना संशयास्पद वस्तु दिसली. त्यांनी तात्काळ त्याची माहिती शिक्षकांना दिली. संबंधित शिक्षकाने संशयास्पद वस्तु पाहिली आणि तात्काळ पोलिसांना कळविले. घटनेची गांभीर्य लक्षात घेवुन पोलिसांनी हालचाल केली. तात्काळ नियंत्रण कक्षाला संपर्क साधून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला एअर फोर्सच्या शाळेकडे रवाना करण्यात आले. बीडीडीएसच्या पथकाने ती हॅन्डग्रेनेड सदृश्य वस्तु निकामी केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एअर फोर्सच्या मैदानावर हॅन्डग्रेनेड सदृश्य वस्तु कोठुन आली याबाबत पोलिस तपास करीत आहेत. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संशयास्पद वस्तु सापडली असून ती निकामी करण्यात आली असल्याचे सांगितले. मात्र, ती संशयास्पद वस्तु हॅन्डग्रेनेडच आहे किंवा आणखी काय याबाबत माहिती घेण्याचे काम चालु असल्याचे सांगितले. दिवाळीतील फटाक्यांची दारु साठलेली एक वस्तू मैदानावर सापडली ती हॅन्डग्रेनेड सारखी दिसत असली तरी ते हॅन्डग्रेनेड नाही. असे पोलीसांंनी नंतर सांगितले आहे. दरम्यान, संशयास्पद वस्तूमधील ‘दारु’ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे.