सुपा एमआयडीसीतील कंपनीत स्फोट

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – सुपा एमआयडीसीतील शुभम इंटरप्रीसेस या ओईल निर्मिती करणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत, त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नगरमधील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. इतर चौघांवर सुपा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंदन, राममोहन ( पूर्ण नावे व पत्ता माहीत नाही) हे गंभीर जखमी आहेत. किरकोळ जखमींमध्ये कमलेश सहानी, लुलदेव सहानी, मोहन मांझी, रवींद्र चेडे  यांचा समावेश आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शुभम इंटरप्रायसेस ही सुपा एमआयडीसीतील कंपनी जुने टायर जाळून त्यापासून ऑईलची निर्मिती करते. आज सकाळी कंपनीतील टायर वितळविण्याच्या भट्टीत अचानक स्फोट झाला. या स्फोटात तब्बल सहा कामगार जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील बर्न हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. स्टाफोटानंतर बराच वेळ कंपनीतील अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत गुप्तता पाळण्याचा प्रयत्न केला. परंतु स्फोटाचा मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती झाली. त्यामुळे कंपनी बाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. जखमींवर उपचार सुरू आहेत.
जपान व भारत यांच्या संयुक्त गुंतवणूकीतून सुपा एमआयडीसीत मोठे प्रोजेक्ट उभे राहत आहेत. त्याचे भूमिपूजन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे. त्यामुळे सुपा एमआयडीसी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आलेली आहे. शुभम इंटरप्रायसेसमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेमुळे या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.