‘कोरोना’च्या काळात 16 लाख मेट्रिक टन शेतमालाची निर्यात

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला. परंतू लॉकडाऊन आणि अनेक गोष्टीवर निर्बंध असतानाही राज्य कृषी पणन मंडळाने 44 निर्यात सुविधा केंद्रावरून विविध देशात भरघोस कृषीमाल निर्यात केला आहे. राज्यातून एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल 16 लाखाहून अधिक मेट्रिक टन शेतमालाची निर्यात केली आहे. तर 4878.97 कोटी रुपयांचा माल निर्यात केला आहे.

जागतिक व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फळे व भाजीपाल्यास परदेशी बाजारपेठेच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. राज्यातून द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, संत्रा आदी फळे व भाजीपाला अशा कृषी मालाची निर्यात होते. पणन मंडळाने विशेष निर्यात कक्ष स्थापन केला असून त्याद्वारे राज्यातील शेतमालाची निर्यात सुरळीत करण्यासाठी मालाची उपलब्धता, इतर आनुषंगिक मालाची वाहतूक, जेएनपीटी येथून कंटेनरची उपलब्धता, फायटोप्रमाणपत्र याबाबत निर्यातदार व निर्य़ातीशी संबधित सर्व घटकांना मार्गदर्शन केल्याचे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले.

माल निर्यात होणारे देश : अमेरिका, जपान, कॅनडा, जर्मनी, युरोपीयन देश, नेदरलॅंड, रशिया, थॉयलंड, कॅनडा, न्युझीलंड, युके, सिंगापूर, चीन, नेपाळ, इराण व दुबई.

कोरोनाच्या काळात राज्यातून समाधानकारक निर्यात झाली आहे. शेतक-यांनी दाखवलेली जिद्द, पणनमंत्री व राज्यमंत्री यांनी दिलेली दिशा आणि पणन विभागाच्या प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखील मंडळाने 24 तास सुरु ठेवलेल्या कंट्रोलरुम आणि सुसज्ज निर्यात सुविधा केंद्रामुुळे हे शक्य झाले आहे. सुनील पवार, कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ, पुणे