पुण्यातील बिबवेवाडीत बनावट सॅनिटायझर बनविणार्‍या कारखान्याचा ‘पर्दाफाश’, 27 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडीत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट सॅनिटायझर्स तयार करणारा कारखान्याचा छापा टाकून पर्दाफाश केला आहे. 6 जणांना अटक करत 27 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर पोलिसांची मोठी कारवाई मानली जात आहे.

कुणाल उर्फ सोनू शांतीलाल जैन (वय ३३, रा. श्री पार्श्वनाथ सोसायटी, कोंढवा बुद्रुक), चेतन माधव भोई (वय २६, रा. गंगाधाम फेस वन, मूळ-जळगाव), इरफान इक्बाल शेख (वय ३२ रा. युनिटी पार्कमध्ये मागे कोंढवा खुर्द), असीम आरिफ मनियार (वय २७, रा. पिताश्री आश्रम जवळ कोंढवा), स्वप्निल शिवाजी शिंदे (वय ३१, रा. सदाशिव पेठ) आणि महेश रामचंद्र टेंबेकर (वय ३१, रा. बासुरी हॉटेलजवळ, सातारा रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरात दोन दिवसापुर्वीच पोलिसांनी बनावट सॅनीटायझर विक्री करणाऱ्या दोघांना पकडले होते. त्यानंतर मुंबईत सुरू असणाऱ्या सॅनीटायझरचा पर्दाफाश केला होता. दरम्यान गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांना माहिती मिळाली, की मार्केटयार्ड परिसरात एक व्यक्ती बनावट सॅनिटायझर्स व्यापाऱ्यांना देण्यासाठी येणार आहे.

त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यांनतर वेगवेगळी पथके तयार करून सुरवातीला जैन व भोई यांना पकडले. त्यानंतर त्यांच्याकडे तपास करून सॅनीटायझर्स बनविणाऱ्यांपर्यंत पोहचले. याप्रकरणी सहा जणांस अटक करून त्यांच्याकडून आतापर्यंत 27 लाख रुपयांचे बनावट सॅनिटायझर्स व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या सॅनिटायर्झच्या बाटल्यांवर मेड इन नेपाळ, मेड इन तैवान असे लेबल लावले असल्याचे दिसून आले आहे. आरोपींनी हे सॅनीटायझर्स शहरासह राज्यात पाठविल्याचा संशय आहे.

महत्वाचे : 
आरोपी स्वप्नील शिंदे व महेश टेंबेकर हे बिबवेवाडी येथील नवसह्याद्री सोसायटी येथे त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये एका फ्लॅटमध्ये बनावट सॅनिटायझर्स तयार करत असल्याचं आढळून आले आहे. त्यासाठी त्यांच्याकडे परवानगी नव्हती. तर आरोपी आरोपी जैन, भोई, शेख, मनियार हे बनावट सॅनिटायझर्सची बाजारात विक्री करत होते.