बँक फ्रॉड करणार्या हाय-प्रोफाईल टोळीचा पर्दाफाश ; पुणे सायबर पोलिसांनी भारतीयांचे सव्वा दोनशे कोटी वाचविले ! 4 आयटी इंजिनिअरसह अन् महिलांसह 8 जण अटकेत; 11 मोबाईल, रोख 25 लाख, 1 क्रेटा, डस्टर कारसह 43 लाखांचा माल जप्त
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांच्या सायबर सेलने महाराष्ट्रासोबतच भारतीयांचे सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवत एका हाय- प्रोफाइल टोळीचा पर्दाफाश केला असून त्यामध्ये 8 जणांचा समावेश आहे. त्यात चक्क 4 आयटी इंजिनिअरसह महिला देखील आहेत. या कारवाईने बँकिंग क्षेत्रात देखील खळबळ उडाली आहे. वर्षानुवर्षे पडून असलेले खाते (डोरमंट अकाउंट – unclaimed account) आणि काही ऍक्टिव्ह बँक खात्याची इंतभूत माहिती चोरून ती विक्री करताना या टोळीला पुण्यात पकडण्यात आले आहे. त्यामुळे सव्वा दोनशे कोटी वाचले आहेत.
रविंद्र महादेव माशाळकर (वय 34, अंबाजोगाई रोड, लातूर), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय 34, मुंबई), मूकेश हरिश्चंद्र मोरे (वय 37, येरवडा), राजशेखर यदैहा ममीडा (वय 34, हैदराबाद), रोहन रवींद्र मंकणी (37, सहकारनगर), विशाल धनंजय बेंद्रे (वय 45, वाशीम), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय 54, सिंहगड रोड), राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42, औरंगाबाद), परमजित सिंग संधू (42, औरंगाबाद) व अनघा अनील मोडक (वय 40, वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार फसवणूक व चोरीप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
यातील चौघेजण हे आयटी इंजिनिअर आहेत. तर काहीजण इतर कामे करतात. दरम्यान आरोपींनी संगणमत करून काही नामांकित बँकातील डोरमंट अकाउंट (निष्क्रिय खाते) आणि काही ऍक्टिव्ह बँक खात्याची माहिती अनधिकृतपणे मिळवली होती. या सर्व बँक खात्यात जवळपास 216 कोटी 29 लाख रुपये होते. दरम्यान, ही पूर्ण माहिती चोरल्यानंतर ते एका व्यक्तीला विक्री करणार होते, पण त्याची माहिती आधीच सायबर सेलला मिळाली. यानंतर सायबर पोलीस गेल्या आठ दिवसापासून या टोळीच्या मागावर होते. त्यानुसार त्यांना काल पथकाने पकडले. सिंहगड रोड परिसरात त्यांना पकडण्यात आले. प्राथमिक तपास केल्यानंतर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. छापेमारी करत पोलिसांनी या टोळीला एकाच ठिकाणी पकडले आहे. यावेळी 11 मोबाईल फोन, रोख 25 लाख, 1 क्रेटा, डस्टर कार व एक मोपेड असा तबल 43 लाख 54 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटक्के, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार वाघचौवरे, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे व त्यांच्या पथकाने केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करत आहेत.
हायप्रोफाइल अन मोठा घोटाळा टळला…
आरोपी हे हाय प्रोफाइल असून, आयटी क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव असून, वेगवेगळ्या प्रसिद्ध अशा कंपनीत ते कामे करतात. त्यांनी वेगवेगळ्या बँकांचे डोरमंट अकाउंट (unclaimed account) आणि काही सुरू असलेले खाते यांची माहिती चोरली होती. यात पासर्वडसह इतर माहिती होती. या खात्यावरून पैसे इतर खात्यावर वळवून फसवणूक करणार होते. त्यानुसार पहिला 25 लाख रुपयांचा व्यवहार देखील एका व्यक्तीसोबत झाला होता. पण पोलिसांनी कारवाई केली व या फसवणूक प्रकरणाचा भांडा फोड झाला आहे.
एका बड्या हस्तीला विक्री..
औरंगाबाद येथील एका बड्या हस्तीला ही माहिती व पैसे विक्री करण्यात येणार होते. त्याची मीडियेटर अनघा मोडक होती. त्यानुसार 25 लाख देऊन जवळपास अडीच कोटींचा डाटा विक्री करण्यात येणार होता. या व्यक्तीला देखील पोलिसांनी नोटीस दिली असून, तो एका न्यूज चॅनेलचा मालक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सहभाग आढळल्यास किंवा त्याला हा चिटिंगचा पैसा आहे हे माहिती असताना तो यात व्यवहार करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
बँकांतील गोपनीय बाहेर पडल्याने पोलिसांसह इतरही अवाक्
बँकेची अत्यंत गोपनीय माहिती बाहेर पडल्याने पोलीस देखील आवक झाले आहेत. कारण, ही माहिती बँकेतूनच लिक होऊ शकते. त्यामुळे यात बँकेचे कोणी तरी इंव्हॉल असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार आम्ही तपास करत असून, लवकरच तेही समोर येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.