परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत 28 ऑगस्टपर्यंत वाढ : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी सन 2020-21 या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. अर्ज करण्यासाठी 14 ऑगस्ट ही शेवटची मुदत होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुदत 15 दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे. आता 28 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊन या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालयाने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे स्वीकारावेत अशा सूचना धनंजय मुडे यांनी यापूर्वीच दिल्या आहेत. तसेच अर्ज करण्यासाठीची मुदत आता 15 दिवसांनी वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, ज्या शाखेत पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, भाजप सरकारच्या काळात घातलेला हा निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रद्द केला आहे.

त्यामुळे आता परदेशी विद्यापीठात विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला, त्या विद्यार्थ्याचे आधी घेतलेले पदवी शिक्षण इतर शाखेचे असले तरी त्याला आता परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. त्याशिवाय या योजनेतील वयोमर्यादा बाबतचा गोंधळ देखील संपवण्यात आला आहे. मूळ निमयमानुसार पदव्युत्तरसाठी 35 वर्षे तर पीएचडीसाठी 40 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.