आरटीई प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९नुसार सन २०१९-२० या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू आहे. मात्र शाळांच्या अडवणुकीमुळे अनेक पालकांना प्रवेश घेता आला नसल्याच्या तक्रारी शिक्षण संचालक कार्यालयाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेश प्रक्रियेला १० मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित झालेल्या पालकांना शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिकच्या शिक्षण संचालकांकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी देण्यात आलेली २६ एप्रिलपर्यंतची मुदत वाढवून ४ मे करण्यात आली होती. आता त्या मध्ये पुन्हा मुदतवाढ करण्यात आली आहे.

सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून –

इयत्ता पहिलीसाठी आरटीईअंतर्गत शाळांकडून प्रवेश दिले जातात. राज्यभरातील १० हजार शाळांमधील १ लाख १६ हजार ७७९ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यासाठी राज्यभरातून २ लाख ४४ हजार ९३३ अर्ज आले. त्यातून पहिल्या फेरीत ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले.
यातील सर्वाधिक अर्ज हे पुणे जिल्ह्यातून आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ४८ हजार ११५ अर्ज पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत. दरम्यान या प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यात १६ हजार ५९४ जागा उपलब्ध आहेत.

या प्रवेशासाठी नोंदणी करताना पालकांना १ किमी, ३ किमी व त्यापेक्षा अधिक अंतरातील फक्त १० शाळा निवडता येतील. परंतु प्रत्यक्ष एकच शाळेला प्रवेश मिळणार आहे. पाल्याला मिळालेला प्रवेश हा कोणत्याही सबळ कारणाशिवाय नाकारता येणार नाही. मुख्य म्हणजे विशिष्ठ कालावधीतच पालकाने आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करायचा आहे. अन्यथा पुढच्या फेरीत त्या पाल्याचा विचार केला जाणार नाही ही महत्त्वाची बाब आहे.