पुण्यातील डॉ. रासने यांच्याकडून 75 लाखांची ‘खंडणी’ उकळल्याप्रकरणी दुसर्‍या ‘डॉक्टर’च्या भावाविरूध्द FIR, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विनयभंगाची केलेली तक्रार मिटविण्यासाठी तसेच तक्रीरीत अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत त्यांच्याकडून 75 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्टोंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी डॉ. दिपक प्रभाकर रासने (वय 69, रा. पर्वती) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनोज अडसूळ (अत्रे) याच्यावर भादवी 420, 384, 388, 389 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. दिपक रासने हे गॅस्ट्रोलॉजीस्ट डॉक्टर आहेत. त्यांचा मुलगा साहिल हा देखील पेशाने डॉक्टर आहे. तर, आरोपी मनोज अडसूळ हा फिर्यादींच्या परिचीत आहे. त्याचा भाऊ डॉक्टर असल्याने त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओळख होती. मनोज हा ब्रोकर म्हणून कामे करतो.

दरम्यान, ऑक्टोंबर महिन्यात एका महिलेची डॉ. साहिल याच्याविरोधात विनयभंग केल्याबाबतचा तक्रारी अर्ज विश्रामबाग पोलीस ठाण्यात आला होता. तक्रारदार महिला दलित मुस्लीम समजाची होती. यावेळी मनोज अडसूळ याने तक्रार मिटवून घेऊ अन्यथा मुलावर बलात्कर, अ‍ॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल होतील, अशी भिती दाखविली. तसेच, त्याला अटक करण्यासाठी वेगवेगळ्या संघटना मागे लागले आहेत. त्यामुळे मुलाला 3 ते 10 वर्षांचा शिक्षा होऊ शकते असे सांगितले.

हे प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादींकडे 1 कोटी 30 लाख रुपयांची मागणी केली.फिर्यादींनी भिती पोटी 21 लाख रुपये रोख स्वरूपात आणि 54 लाख रुपये चेकद्वारे घेऊन फसवणूक केली. त्यानंतरही उर्वरित रक्कम घेण्यासाठी भिती दाखविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत फिर्यादींनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली होती. आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, या अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यानुसार अडसूळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.