सोलापूर मनपा उपायुक्तांना शिवीगाळ करुन मागितली 5 लाखाची खंडणी, गुन्हा दाखल होताच भाजपचे उपमहापौर फरार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर व उपायुक्तांना शिवीगाळ करून उपायुक्तांना पाच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचे उपमहापौर राजेश काळे (Deputy Mayor Rajesh Kale) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेश काळे (Rajesh Kale) हे फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

या प्रकरणी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, एका सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. त्या परिसरात ई-टॉयलेट, कचरापेट्या व इतर साहित्याची व्यवस्था करावी. यासाठी भाजपचे उपमहापौर राजेश काळे हे झोन अधिकाऱ्यांना फोन करुन शिवीगाळ करीत होते. प्रशासनाच्या मान्यतेशिवाय पालिकेची मालमत्ता कुठेही नियमबाह्य पद्धतीने नेता येणार नाही. तुम्ही शासकीय नियमानुसार यापूर्वीच पत्रव्यवहार करणे गरजेचे होते. असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

यावरून संतापलेल्या उपमहापौर राजेश काळे यांनी रविवारी उपायुक्त धनराज पांडे, झोन अधिकारी नीलकंठ मठपती यांना आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनाही फोन करुन शिवीगाळ केली आणि उपायुक्त धनराज पांडे यांना पाच लाखाची खंडणी मागितली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरुन भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरोदात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, खंडणी मागणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर बाझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून उपमहापौर राजेश काळे हे फरार झाले आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.