रूंदीकरणातील बाधित शेतकर्‍यांना मिळणार वाढीव भरपाई, प्रतिगुंठा मिळणार एवढी रक्कम

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण करत असताना शेतकर्‍यांच्या संपादित शेतीला योग्य मोबदला मिळाला नाही. त्यावर या शेतकर्‍यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाच्या लवादाने दीड ते साडेचार लाख रूपये प्रतिगुंठा वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिल्याने दुष्काळात शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी महामार्गालगत असलेल्या जमिनी संपादित करण्यात आल्या. सन 2008 ते सन 2011 या कालावधीत दौंड तालुक्यातील पाटस हद्दीतील शेतीचे संपादन केले. यासाठी भारत सरकारच्या विशेष भूमी संपादन अधिकारी क्र. 17 यांच्यामार्फत हे अधिग्रहण करण्यात आले. त्यावेळी कोणत्याही प्रकारचे शेती व बिगरशेती असे वर्गीकरण न करता सरसकट बाधित शेतकर्‍यांना प्रतिगुंठा रु. 43000 ते रु. 62500 असा भाव देण्यात आला. यामुळे शेतकर्‍यांत प्रचंड रोष निर्माण झाला.

यावर शेतकर्‍यांच्या वतीने युनिक असोसिएटस् पुणे यांच्या कडून अ‍ॅड. अशोक फडके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. यावर एक लवाद नेमून याची संपूर्ण माहिती घेण्यात आली. या लवादाने नुकताच निकाल देऊन पाटस ता. दौंड येथील शेतकर्‍यांना जमिनीची प्रतवारीनुसार रु. दीड ते साडेचार लाख रूपये प्रतिगुंठा वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या निकालामुळे या दुष्काळी भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Visit : Policenama.com