बालाकोटमध्ये मारले गेले ‘एवढे’ अतिरेकी, इटालियन पत्रकाराचा शोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहन ताफ्यावर हल्ला होऊन ४० जवान शहीद झाल्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई दलाने पाकिस्तान मधील बालाकोट येथे घुसून जैशच्या दहशतवादी तळावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात किमान १३० ते १७० दहशतवादी ठार झाल्याचा दावा इटालियन पत्रकाराने केला आहे. त्याचप्रमाणे किमान ५० दहशतवाद्यांवर उपचार सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा इटालियन पत्रकार फ्रेन्सिसा मरिनो याने स्ट्रिंगर एशिया मध्ये एका लेखात केला आहे.

पाकिस्तान सरकारने मात्र या सगळ्याचा इन्कार करत भारताने टाकलेले हे बॉम्ब झाडांवर पडले आणि यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचा दावा केला आहे. मात्र पत्रकार फ्रेन्सिसा मरिनो याने पाकिस्तानने केलेला खोटारडेपणा उघडकीस आणला आहे. जे जे जखमी झाले त्यांना उपचार करून घरी न सोडता त्यांना कस्टडीमध्ये ठेवण्यात आल्याचा दावा त्याने या लेखामध्ये केला आहे. पाक सरकारने या हल्ल्यात जे ठार झाले त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिल्याचा दावा त्याने केला आहे. हल्ला झालेल्या भागात जाण्यासाठी रस्ता कच्चा आहे आणि हा रस्ता बंद केला गेला आहे असेही त्याने या लेखात म्हटले आहे.

दरम्यान, भारताने हा हल्ला करण्यासाठी वापरलेले बॉंब इस्त्रायलचे स्पाईस २००० हे आहेत. हे अतिशय धोकादायक बॉम्ब असून हे बॉम्ब प्रथम १ मीटर खोल जमिनीत घुसतात आणि त्यानंतर त्यांच्या स्फोट होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या लेखाचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.