कोलवडीत 5 दिवसांचं स्त्री जातीचं अर्भक सापडल्यानं प्रचंड ‘खळबळ’

पुणे (लोणी काळभोर) : पोलीसनामा ऑनलाइन – कोलवडी येथील विठ्ठल मंदिरात एका अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळी  पाच ते सहा दिवसाचे स्री जातीचे आर्भक ठेवण्यात आले. सकाळी त्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकल्याने हा धक्कादायक  प्रकार उघडकीस आला. याची माहिती गावात कळल्यावर येथील शेजारी राहणार्या पुजा पवार व संगीता आडसूळ या मंदीरात आल्या आणि बाळाला जवळ घेऊन शांत केले.

या घटनेची माहिती लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व या लहानगीला पोलिस स्टेशन मध्ये घेऊन गेले. तेथे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्या बालकास ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ते बाळ सुखरुप असून त्याला ससून रुग्णालयातील शिशु  सुश्रुशालयात ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हाके यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत माने करीत आहेत.