फेसबुकनं अ‍ॅमेझॉन सारख्या १५० बड्या कपंन्यांना दिला तुमचा ‘हा’ डाटा 

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणानंतरही फेसबुक शहाणे झाले नसून त्यांनी आपल्या वापरकर्त्यांचा खासगी डाटा मायक्रोसॉफ्ट व अ‍ॅमेझॉन सारख्या १५० बड्या कंपन्यांना उपलब्ध करुन दिला आहे. मित्रांना पाठविलेले खासगी संदेश व संपर्क माहितीचाही या डाटात समावेश आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने हा भंडाफोड केला आहे़ टाइम्सने म्हटले की, फेसबुकने नेटफ्लिक्स व स्पॉटीफाय या कंपन्यांना वापरकर्त्यांचे खासगी संदेश वाचण्याची परवानगी दिली आहे. मायक्रोसॉफ्टचे सर्च इंजिन ‘बिंग’ला फेसबुक वापरकर्त्यांच्या मित्रांची नावे विनापरवानगी पाहण्याची सोय केली आहे. अ‍ॅमेझॉन आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फेसबुक वापरकर्त्यांची नावे आणि संपर्क विषयक माहिती पाहू शकते.

केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका डाटा फुटी घोटाळा उघडकीस आल्यापासून फेसबुक वादाच्या भोवºयात सापडले आहे. मार्चमध्ये उघडकीस आलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश राजकीय सल्लागार संस्था केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने ८७ दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांचा डाटा विनापरवानगी वापरला होता. फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांचा डाटा १५० पेक्षा जास्त कंपन्यांना दिला आहे.

यातील बहुतांश कंपन्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. आॅनलाईन रिटेलर्स व मनोरंजन वेबसाईट तसेच वाहन उत्पादक व माध्यम संस्था यांचा त्यात समावेश आहे.

२०११ मध्ये फेडरल ट्रेड कमिशनसोबत (एफटीसी) केलेल्या करारानुसार, विनापरवानगी डाटा सामायिक करणार नसल्याचे फेसबुकने मान्य केले होते. हा करार फेसबुकने मोडला आहे. एफटीसीच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या डेव्हिड व्लाडेक म्हणाले की, वापरकर्त्यांना न कळवताच त्यांचा डाटा वापरण्याची परवानगी तिसºया पक्षाला फेसबुककडून दिली जात आहे.