आयर्लंडहून Facebook च्या स्टाफनं दिल्लीला ‘कॉल’ करून मुंबईतील आत्महत्येचा प्रयत्न रोखला !

नवी दिल्ली : आयर्लंडमध्ये बसलेल्या फेसबुकच्या एका स्टाफने भारतात 27 वर्षांया एका व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त केले. आयर्लंडहून दिल्ली आणि नंतर दिल्लीहून मुंबई…एका पाठोपाठ एक धडाधड कॉल केले गेले, नंतर 7 तासांच्या आत त्या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहचले आणि त्यास आत्महत्या करण्यापासून रोखले गेले. या मिशनमध्ये दिल्ली आणि मुंबई पोलिसांचे तीन डीसीपी आणि कर्मचारी काम करत होते.

आत्महत्येची अशी माहिती मिळाली
शनिवारी संध्याकाळी एका व्यक्तीने फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओ टाकला. तो पाहून वाटले की, तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सर्व आयर्लंडमध्ये बसलेल्या फेसबुक स्टाफने पाहिले. त्यांना व्हिडिओ पाहून जाणवले की, हा व्यक्ती आत्महत्या करू शकतो. यानंतर त्यांनी माहिती घेतली की, हे फेसबुक अकाऊंट कुठले आहे. तपासात समजले की, हे अकाऊंट चालवणारा दिल्लीत राहतो. फेसबुकच्या या स्टाफने ताबडतोब दिल्लीत सायबर सेलचे डीसीपी अनयेश रॉय यांना कॉल केला.

घरोघरी पोहचली पोलिसांची टीम
सायंकाळी सुमारे 7 वाजून 51 मिनिटांनी डीसीपींना फेसबुक अकाऊंटशी संबंधित आयपी अ‍ॅड्रेस शेयर केला गेला. याशिवाय त्यांना अकाऊंटशी जोडलेला मोबाईल नंबरसुद्धा देण्यात आला. सायबर सेलने या नंबरवर कॉल केल्यानंतर समजले की, हे अकाऊंट चालवणारा दिल्लीतील मंडावलीमध्ये राहतो. ताबडतोब पूर्व दिल्लीचे डीसीपी जसमीत सिंह यांना माहिती दिली गेली. यानंतर समजले की, हे अकाऊंट कोणत्या तरी महिलेच्या नावावर रजिस्टर्ड आहे. दिल्ली पोलीसांचे अधिकारी त्यांच्या घरी पोहचले. महिलेने सांगितले की, हे अकाऊंट तिचेच आहे, परंतु या फेसबुकचा वापर तिचा पती करतो. महिलेने सांगितले दोन आठवड्यांपूर्वी पतीशी तिचे भांडण झाले होते. यानंतर पती मुंबईला गेला. परंतु, तिला हे माहित नव्हते की, मुंबईमध्ये तो कुठे राहतो.

मुंबईत सुरू झाली शोधाशोध
यानंतर रात्री समारे साडेनऊ वाजता मुंबई सायबरच्या डीसीपी डॉक्टर रश्मी कर्नादिकर यांना कॉल करण्यात आला. त्यांना सर्व माहिती देण्यात आली. परंतु, जेव्हा त्या व्यक्तीला कॉल करण्यात आला तेव्हा त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. यानंतर पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आईला त्याला कॉल करण्यास सांगितले आणि नंतर त्याचे लोकेशन समजले. रात्री सुमारे दिड वाजता पोलिसांची टीम त्याच्या घरी पोहचली. त्या व्यक्तीने सांगितले की तो लॉकडाऊनच्या आर्थिक तंगीमुळे त्रस्त आहे. म्हणून त्याने आत्महत्या करण्याचा प्लॅन केला होता. रात्री सुमारे 3 वाजता पोलिसांनी त्यास समजावले आणि नंतर त्याने आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला.