सावधान ! आता फेसबुकवरची ‘फेक पोस्ट’ एका क्लिकवर समजणार

औरंगाबाद : वृत्तसंस्था – फेसबुकवर चुकीची माहिती प्रसारीत झाल्यामुळे देशात बऱ्याचदा मोठा गदरोळही झाला आहे. खोट्या मजकुराच्या पोस्टमुळे चुकीची माहितीदेखील लोकांपर्यंत पोहोचली आहे. या गोष्टींवर आता फेसबुक फिल्टर सेंटरच्यामार्फत आळा घालता येणार आहे. फेसबुकवरील एखादी वादग्रस्त किंवा कुठलिही पोस्ट खरी आहे की खोटी हे एका क्लिकवर समजणार आहे. त्यासाठीचं राज्यातील पहिलं फिल्टर सेंटर औरंगाबादमध्ये सुरु करण्यात आलं आहे.

फेसबुक फिल्टर सेंटर –
निवडणुकीच्या काळात फेसबुकवर वायरल होणाऱ्या ‘फेक’ पोस्टवर आळा घालण्यासाठी फेसबुकनं पाऊल उचललं आहे. फेसबुकवरील एखादी पोस्ट शेअर करताना त्या पोस्टमधील मजकूर खरा आहे की खोटा हे आता एका क्लिकवर समजणार आहे. फेक पोस्टवर आळा घालण्यासाठी फेसबुकनं देशात वेगवेगळ्या ठिकाणी फिल्टर सेंटर सुरु केले आहेत. फेसबुक फिल्टर सेंटर येथून बातम्यांवर संशोधन करुन त्या बातम्या फिल्टर केल्या जाणार आहेत. त्यासाठी काही सॉफ्टवेअर कंपन्यांसोबत फेसबुकनं करार केला असून त्यांना फेसबुक पोस्टची सत्यता तपासण्याचं काम देण्यात आलं आहे. फेसबुकवर वायरल होणाऱ्या पोस्टबाबत पुर्ण माहिती येथे तपासली जाते. वायरल होत असलेली पोस्ट जर फेक असेल तर त्याखाली तशी सुचना दिली जाते.

औरंगाबादमधील फेसबुकच्या फिल्टर सेंटरमध्ये मराठी, हिंदी आणि मल्याळम या तीन भाषेच्या फेसबुक पोस्टची सत्यता तपासली जाणार आहे. यासाठी 9 कॅटेगरी तयार करण्यात आल्या असून त्याद्वारे फेसबुक पोस्टची सतत्या तपासली जाणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. निवडणुकीदरम्यान, मोठ्या प्रमाणात फेक न्यूजचा प्रचार होतो. त्यामुळे या फेक न्यूजवर आळा घालता यावा, म्हणून फेसपबूकने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.