फेसवॉश वापरताय ? जरा सांभाळून

वृत्तसंस्था :

सध्या फेसवॉश वापरत नाही अशा व्यक्ती क्वचितच सापडतील. आजकाल बाजारात वेगवेगळ्या ब्रॅण्ड्स चे फेसवॉश मिळतात पण हे फेसवॉश वापरणे घातक आहे. एन्वाइरन्मेंट प्रोटेक्शन ग्रुप टॉक्सिक लिंकनुसार, भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक जास्त विक्री होणा-या महत्वाच्या अशा १६ ब्रॅंडमधील १८ पर्सनल केअर उत्पादनांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत फेशवॉशमध्ये ५० टक्के आणि स्क्रबमध्ये ६७ टक्के मायक्रोप्लास्टिक असल्याचे आढळून आले. या मायक्रोप्लास्टिकलाच मायक्रोबीड्स असे देखील संबोधले जात असून अनेक देशांमध्ये यासारख्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.

वाहनांचा धूर ,प्लास्टिक यासारख्या अनेक गोष्टी प्रदूषणात वाढ करणाऱ्या आणि पर्यायाने पर्यावरणाचा नाश करणाऱ्या आहेत. आता यात सौन्दर्यप्रसाधनांचीही भर पडली आहे. प्रसाधनांमध्ये सर्वात जास्त वापरात येणारी वस्तू म्हणजे ‘फेसवॉश’. पण, हा फेसवॉशही काही प्रमाणात प्रदूषणकारी आहे.

फेसवॉश आणि स्क्रबमुळे जरी आपला चेहरा उजळून निघत असल्याचा दावा कंपन्या करत असल्या तरी या वस्तूंमध्ये असलेल्या मायक्रोप्लास्टिकमुळे प्रदूषणात भर पडत आहे. हे मायक्रोप्लास्टिक जलजीव आणि मानवासाठी धोकादायक ठरत आहेत.बाजारात विकणा-या अनेक पर्सनल केअर उत्पादानांच्या चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये बहुतांश प्रसाधनांमध्ये नॉन- बायोडिग्रेडेबल मायक्रोबिड्स असल्याचे आढळून आले आहेत. हे नॉन- बायोडिग्रेडेबल मायक्रोबिड्स पाण्यामार्फत नदी, समुद्र या जलसाठ्यांपर्यंत पोहोचते आणि नकळतपणे अन्नसाखळीच्यामार्फत ते माणसांच्या ताटापर्यंत पोहोचतात.
आता आपला फेसवॉश निवडताना खबरदारी घेऊनच निवडा .