Fact Check : 3 ते 20 मे पर्यंत देशव्यापी Lockdown ची घोषणा? जाणून घ्या नेमकं सत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक वाढणा-या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. याच पार्श्वभूमीवरच पुन्हा एकदा देशभरात संपूर्ण लॉकडाऊनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबतचे अनेक मेसेजही व्हायरल होत आहेत. कोरोनामुळे केंद्र सरकारने देशभरात 3 मे ते 20 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केल्याची दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचाही वापर केला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र हा दावा पूर्णतः खोटा असल्याची माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊनबाबत व्हायरल होणारा हा मेसेज प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्राने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केली नसल्याचे स्पष्टीकरण पीआयबीने दिले आहे. त्यामुळेच 3 मे ते 20 मे दरम्यान देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू होत असल्याचे वृत्त खोटे असल्याचे समोर आले आहे. दरम्यान कोरोनामुळे काही ठिकाणी भीषण चित्र निर्माण झालं आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज 5 हजारांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.