Mumbai news : लोकल सेवा 29 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी होतेय सुरु ? जाणून घ्या ‘सत्य’

पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना संकटामुळे गेल्या 9 महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईची ‘लाइफलाइन’ म्हणजेच लोकल ट्रेन (Mumbai Local Train) केंव्हा सुरु होणार याची चर्चा डिसेंबर महिन्यांपासून सुरू झाली होती. दरम्यान मध्य रेल्वेने प्रजासत्ताक दिनी एक पत्रक जारी केले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर 29 जानेवारीपासून लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होत असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. पण खरच शुक्रवार (दि.29 जानेवारीपासून) सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरू होतेय का? हे जाणून घ्या.

काय आहे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणारा मेसेज
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असल्याचा सांगणारा एक मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. यात 29 जानेवारीपासून उपनगरीय लोकल सर्वसामन्यांसाठी सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

 

 

 

काय आहे सत्य ?
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेने मुंबईच्या लोकलबाबत पत्रक जारी केले असले तरी त्यात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होत असल्याची कोणतीही घोषणा केली नाही. मध्य आणि पश्चिम रेल्वेने शुक्रवारपासून (दि. 29) लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने सध्या सुरू असलेल्या फेऱ्यांमध्ये वाढ करून त्या 1580 वरून 1685 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेने, सध्या सुरू असलेल्या 1201 फे-यामध्ये वाढ करून 1300 फे-या करणार आहे. परंतु, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा राहील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.