Fact Check : CM तीरथ सिंह रावतांच्या मुलीनेच घातली फाटकी जीन्स? जाणून घ्या सत्य

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे वरीष्ठ नेते आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे सध्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. रावत यांनी एका कार्यक्रमात आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात हे सगळे बरोबर आहे का, हे कसले संस्कार असे विधान केले होते. रावत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरातून पडसाद उमटत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत असून यात मुख्यमंत्री रावत यांच्या मुलीनेच फाटलेली जीन्स परिधान केल्याचा दावा केला जात आहे. चक दे फेम अभिनेत्री चित्राशी रावतचा तो फोटो असून सध्या तो तुफान व्हायरल होत आहे. मात्र आता स्वत: चित्राशी रावतने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

 

 

 

 

 

याबाबत अभिनेत्री चित्राशी रावत म्हणाली की, सध्या सोशल मीडियावर माझा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मी एक रिप्ड जीन्स परिधान केली आहे. हा फोटो व्हायरल होताना मी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांची मुलगी असल्याचा दावा केला जात आहे. पण हे पूर्णपणे खोट आहे. माझ्या वडिलांचे नाव देखील तीरथ सिंह रावत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचा गोंधळा उडाल्याची माहिती चित्राशीने आजतकला प्रतिक्रिया देताना दिली आहे. दरम्यान सर्वच स्तरातून जोरदार टीका होत असतानाही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. तीरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्सबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर आता पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही पण तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध असल्याचे रावत यांनी म्हटले आहे.