आरे कारशेडसाठी 400 नव्हे तर 70 कोटी झाले खर्च, RTI मधून खुलासा झाल्यानं फडणवीसांचा दावा चुकीचा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मुंबईतील मेट्रोच्या कारशेडवरून ( Metro Carshed) मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु होता. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) यांनी ११ ऑक्टोबरला आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजुरमार्ग ( Kanjurmarg) हलवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली होती. हे कारशेड हलवण्याचा निर्णय हा दुर्देवी असून तो केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी केला होता. त्याचबरोबर या कारशेडवर ४०० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा देखील त्यावेळी फडणवीस यांनी केला होता. परंतु आता माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मेट्रो प्रशासनाने दिलेल्या उत्तरामध्ये फडणवीस यांनी खर्चासंदर्भात केलेला दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झालं आहे.

यासंदर्भात आरे येथील जंगलांच्या संवर्धनार्थ काम करणारे पर्यावरणवादी झोरु भथेना यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये उत्तर देताना आरेमध्ये या कारशेडवर सरकारने केवळ ७० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उरलेला ३७० कोटी रुपयांचा निधी कुठे गेला असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. त्यांच्या या खुलाश्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने ( Mumbai Metro Rail Corporation Limited) यासंदर्भात ७० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती या अर्जाला उत्तर देताना दिली आहे.

यामध्ये झाडे कापण्यासाठी पाच कोटी, कारशेडसाठी जमीन तयार करण्यासाठी २७ कोटी, ड्रेनेज लाईन आणि पाईप लाईन हटवण्यासाठी दोन कोटी खर्च करण्यात आल्याचे मेटन्रोने म्हटलं आहे..दरम्यान, भथेना यांनी यासंदर्भात खर्चाचा फोटो पोस्ट करत उरलेले ३७० कोटी रुपयांचा निधी कुठे गेला असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. त्यामुळे फडणवीस यांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You might also like