‘फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना महामंडळाकडे दुर्लक्ष केलं अन् आता फक्त राजकीय स्टंटबाजी करतायेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी तीन वेळा संप केला. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीचा ठोस निर्णय घेतला नाही. मात्र, आता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पूर्ण पगार देण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन दिले आहे. या निवेदनामुळे एसटी कामगार संघटनेकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा एक राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया संघटनांनी दिली.

एसटी महामंडळाने एसटी कामगारांना मे महिन्याचे वेतन 50 टक्केच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटना आधीच संतापल्या आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेऊन परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून संपूर्ण वेतन देण्याची मागणी केली आहे. मात्र, फडणवीसांची ही मागणी फक्त राजकीय स्टंट असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.

एसटी कामगारांना पूर्ण वेतन मिळावे, ही भूमिका सर्व संघटनांची आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एसटी महामंडळाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे होते. आता विरोधी पक्षात असताना विरोधाला विरोधाचे राजकारण न करता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला विशेष आर्थिक पॅकेज मिळवून द्यावे. जेणेकरून मे महिन्यासह पुढील सहा महिन्याचे वेतन महामंडळाला देता येईल, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे.

एसटी महामंडळाचा संचित तोटा देखील फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये झाला. महापुराच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांना कोणतेही सहाय्य करण्यात आले नसल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले. एसटी कर्माचाऱ्यांना मे महिन्याचा पूर्ण वेतन मिळवण्यासाठी आमची संघटना आग्रही आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी ही राजकीय स्टंटबाजी आहे. देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना एसटीसाठी कोणतीही ठोस धोरण राबिवले नाहीत, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.