’फडणवीसांनी खडसेंचा राजकीय बळी घेतला’, नारायण राणेंचं ते ट्विट व्हायरल !

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राज्यातील भाजपाला मोठा धक्का बसला आहे. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. खडसे यांनी पक्ष सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. असे असतानाच कुणीतरी भाजपा नेते नारायण राणे यांचे एक जुने ट्विट व्हायरल केल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

https://twitter.com/MeNarayanRane/status/739034143267246080

‘देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला असून भाजपामध्ये बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे राणे यांनी केलेल्या या ट्विटमध्ये म्हटले आहे. परंतु, सत्य हे आहे की, नारायण राणे यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत चार वर्षांपूर्वी म्हणजे 4 जून 2016 रोजी हे ट्विट केले होते. एकनाथ खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर हे ट्विट पुन्हा व्हायरल झाले आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. मी फक्त देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी दाखल करायला लावला. याचा मला आणि माझ्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप झाला, असे ते म्हणाले.

खडस यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी म्हटले की, एकनाथ खडसे यांनी मला व्हिलन ठरविले आहे. त्यांनी राजीनामा दिला, हे दुर्दैवी आहे. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. माझ्याबाबत तक्रारी असतील तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला पाहिजे होते. एकनाथ खडसे अर्धसत्य सांगत आहेत. मला त्यावर बोलायचे नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवायचे आहे. त्यांनी मला ठरवले. मला त्यावर काहीही बोलायचे नाही, भाजपा हा मोठा पक्ष, कुणाच्या जाण्याने किंवा येण्याने पक्ष थांबत नाही. जळगाव जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तेथील जनता भाजपासोबतच आहे, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, मुंबईत 23 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.