‘त्या’ सामन्यानंतर मला व पत्नीला मिळाली होती जीवे मारण्याची धमकी; दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – २०११ च्या विश्वचषकात उपांत्यपूर्व सामना ‘न्यूझीलंडविरुद्ध झाला होता. त्यावेळी पराभवादरम्यान एबी डिव्हिलियर्स धावबाद झाला होता. त्यामुळे मला आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असा खुलासा फाफ डु प्लेसिस याने केला.

मीरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध द. आफ्रिका हा सामना झाला होता. सामन्यात न्यूझीलंडच्या २२२ धावांचा पाठलाग करताना १७२ धावांत बाद होताच द. आफ्रिका संघ ४९ धावांनी पराभूत झाला. त्या सामन्यात डु प्लेसिसने ४३ चेंडूत ३६ धावा काढल्या होत्या. ही स्पर्धा भारताने जिंकली होती.

डुप्लेसिसचा हवाला देत ईएसपीएन क्रिकइन्फोने सांगितले की, सामना संपताच मला आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आम्हा दोघांवर अत्यंत हीन आणि अर्वाच्य भाषेत सोशल मीडियात टीका करण्यात आली. अनेक आक्षेपार्ह आरोप झाले. ‘कारकिर्दीत धमकी आरोप अशा अवस्थेतून सर्वच खेळाडू जात असतात, अशावेळी ते अनेकांशी संपर्क ठेवत नाहीत. त्यामुळेच शिबिरातच मी सुरक्षित स्थानाचा शोध घेत क्रिकेटमध्ये घाम गाळत राहिलो, असे प्रसंग आपल्याला आत्ममग्न होण्यास भाग पाडतात’, असे डुप्लेसिसने म्हटले आहे.