हडपसरमध्ये पालिकेच्या पावसाळापूर्व कामाचा फज्जा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  हडपसर क्षेत्रीय कार्यालयाने पावसाळापूर्व केलेल्या कामाचा पुरता फज्जा उडाला आहे. ज्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत, त्यांच्याकडून पुन्हा ती कामे करून घेतल्यानंतर त्यांची बिले काढावीत. तसेच, हडपसर परिसरातील पावसाळापूर्व कामे ज्या ठेकेदारांनी केली आहेत, त्याची अधिकाऱ्यांनी पाहणी का केली नाही, अशा कामचुकार अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी हडपसरवासियांनी केली आहे.

उन्नतीनगरमध्ये पावसाळापूर्व कामे केली नाहीत. त्यामुळे मलवाहिनी गाळाने भरली असल्याने अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. पाणी घरात शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तू भिजल्या, तर लहान मुलांना घेऊन रात्रभर जागे राहण्याची वेळ आली. मागिल तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. काळेपडळमधील ओंकार शिंदे यांच्यासह अनेकांच्या घरामध्ये तीन-चार फूट पाणी साचले होते. कोरोना व्हायरसमुळे मागिल तीन महिन्यापासून रोजगार बंद असल्याने घराची दुरुस्ती करता आली नाही. त्यातच अचानक पाऊस झाल्याने घरात रात्र जागून काढावी लागली, अशी व्यथा झोपडपट्टीतील नागरिकांनी मांडली.

हडपसरमधील मुकेश वाडकर म्हणाले की, मागिल तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने काळेपडळ, म्हसोबानगर, उन्नतीनगर, वाडकरमळा, हडपसर उड्डाण पुलाखाली, मंत्री मार्केट, सानेगुरुजी हॉस्पिटलसमोर, स्मशानभूमीजवळील शितळादेवी मंदिर, हडपसर गाव अनेक ठिकाणचे चेंबर तुंबले आहेत, झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. रवीदर्शन समोर अडीच-तीन फूट पाणी साचले होते. ही परिस्थिती मागिल अनेक वर्षांपासूनची आहे, तरीसुद्धा त्यावर अद्याप पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना उपाययोजना करता आली नाही, हे हडपसरवासियांचे दुर्दैव आहे.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील पालिका सहायक आयुक्त सुनील यादव म्हणाले की, पावसाळापूर्व कामे केली आहेत. मात्र, आता पावसाळी वाहिनी की मलवाहिनी तुंबली हे पाहावे लागेल. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, त्यासाठी तातडीने उपाययोजना केली जाईल. नागरिकांनी पाणी साचल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार तातडीने कामे मार्गी लावली जातील, असे त्यांनी सांगितले.

दिवेघाट वाहू लागले धबधबे

मागिल तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावासाने राज्य झोडपून काढले आहे. या पहिल्या पावसात दिवघाटतील धबधबे वाहिलेला पहिला-वहिला इतिहास आहे. मागिल अनेक वर्षांपासून दिवे घाटातून वाहन घेऊन जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच धबधबे वाहिले नव्हते. यावर्षी पहिल्यांदा रात्रीच्या वेळी पाऊस सुरू असताना वाहनचालकांनी दिवे घाटात वाहने थांबविली. कारण धबधब्यांचा प्रवाह जोरदार असल्याने वाहन चालविणे धोक्याचे असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.