बनावट कागदपत्रांच्या आधारे हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न ; ‘या’ नामांकित हॉटेलच्या व्यवस्थापकावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट कागदपत्रे तयार करुन ती सरकारी कार्यालयात सादर करत रुपाली हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकऱणी व्यवस्थापकाविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशेंद्र सुंदर शेट्टी (वय ६४, रा़ बाणेर) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी सलील शेट्टी (वय ३४, रा़ मॉडल टाऊन) यांनी फिर्याद दिली आहे़.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलील शेट्टी हे हॉटेल रुपालीचे मुळ मालक श्रीधर बाबू शेट्टी यांचे नातू आहेत. त्यांची आजी आप्पी श्रीधर शेट्टी यांनी करार करुन शशेंद्र शेट्टी यांना व्यवस्थापक म्हणून नेमले होते़. १ जुलै २०११ ते ३० जून २०१६ पर्यंत पाच वर्षाचा हा करार करण्यात आला होता. मात्र, हा करार संपण्या अगोदरच शशेंद्र शेट्टी याने खोटी कागदपत्रे तयार केली़ व त्यावर वयोवृद्ध आप्पी शेट्टी यांच्या सह्या घेऊन भाडेकरार केला़. हे समजल्यावर आप्पी शेट्टी यांनी भाडेकरार रद्द केला व सलील शेट्टी यांना रुपाली हॉटेलचा व्यवसाय पाहण्यासाठी करार करण्यात आला व तशी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करण्यात आली़. त्यानंतर आप्पी यांचे निधन झाल्यावर शशेंद्र यांनी रद्द झालेले लिव्ह अन्ड लायसन्स खरे आहे असे सरकारी कार्यालयात भासविले. हॉटेलचा परवाना, शॉप अक्ट, पोलीस आणि खाद्य परवाना आपल्या नावावर करून घेतला.

सलील शेट्टी हे ताबा घेण्यासाठी घेल्यानंतर त्यांना हॉटेलचा ताबा न देता अनेक वर्षे हॉटेलचा वापर करुन लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली. मागील एक वर्षापासून शेट्टी यांनी डेक्कन पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा धावा केला. मात्र, सोमवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शशेंद्र शेट्टी हा पसार झाला आहे