सावधान ! पुणे विद्यापीठाच्या नोकरीची दिली जातात बनावट नियुक्तीपत्रे

दोघांची ७ लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट लिपिकपदावर नियुक्ती झाल्याचे पत्र देऊन मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना नोकरीच्या नियुक्तीची बनावट पत्रे देऊन त्यांची ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यशवंत शिवाजी खेडकर आणि भरत शिवाजी खेडकर (दोघे रा. वंजारवाडी, बारामती) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुलभा अरुण बनसोडे (वय ६०, रा. गुरुवार पेठ) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०१८ पासून सुरु आहे. खेडकर यांनी बनसोडे यांना तुमच्या मुलाला सावित्रीबाई फुले यांना पुणे विद्यापीठास नोकरी लावतो, असे म्हणून त्यांना लिपिक पदावर नियुक्ती झाल्याचे पत्र दिले. त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये घेतले. मुलाला नोकरीचे पत्र पाहून आपल्या बहिणीलाही नोकरी लावा असे बनसोडे यांनी खेडकर यांना सांगितले. तेव्हा त्यांच्या बहिणीकडूनही या दोघांनी साडेतीन लाख रुपये घेतले व त्यांनाही नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर ते हे पत्र घेऊन पुणे विद्यापीठात गेले असताना त्यांना नियुक्तीचे पत्र बनावट असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी खेडकर यांच्याकडे पैसे परत मागितले. मात्र, त्यांनी टाळाटाळ केल्याने शेवटी त्यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली आहे.