पुणे-सातारा रस्त्यावरील ‘राव नर्सिंग होम’मध्ये भरदिवसा घुसून क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगत महिला व तिच्या चार साथीदारांकडून अकाउंटंटचे अपहरण; 30 लाखाच्या खंडणीची मागणी, एकजण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सातारा रस्त्यावरील नर्सिंग होममध्ये भरदिवसा घुसून क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगत महिला व तिच्या चार साथीदारांनी अकाउंटचे काम करणाऱ्या तरुणाचे अपहरणकरून 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याला बोपदेव घाटात नेल्यानंतर बेदम मारहाण केली होती. गेल्या महिन्यात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा पुणे-सातारा रस्त्यावरील राव नर्सिंग होममध्ये अकाउंटंट म्हणून नोकरी करतो. गेल्या महिन्यात (दि. 5 मार्च) भरदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एक महिला व दोघेजण तेथे आले. त्यांनी तोंडाला मास्क लावले होते. महिलेने स्कार्फ बांधला होता.

त्यांनी तरुणाला आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत, असे सांगत तुझ्याकडे चौकशी करायची असल्याने हॉस्पिटलमधून त्याला बाहेर नेले. तर येथील एका गल्लीत नेल्यानंतर तेथे आणखी दोघेजण रिक्षात मास्क लावून बसले होते. या तरुणाला त्यांनी रिक्षात बसवले व शिवीगाळ करत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तू हॉस्पिटलमध्ये पैश्यांचा अपहार करतो, आता तुझ्यावर कारवाई करून तुला जेल पाठवतो असे म्हणत धमकावले. त्यानंतर त्याला दुचाकीवर बसवून त्याला बोपदेव घाटात नेत त्याचे अपहरण केले. त्याठिकाणी एका हॉटेलमध्ये नेहून त्याला 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे नाही दिले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर त्याला बेदम मारहाण करण्यात आली.

भीतीपोटी तरुणाने पैसे देतो,असे सांगितल्यानंतर त्याला कोंढवा येथील एका एटीएम केंद्रात आणण्यात आले. त्याठिकाणी त्याच्या खात्यावरून एकूण 78 हजार 500 रुपये काढले. त्यानंतर त्याला पैसे दे म्हणत मारहाण केली आणि एका रिक्षात बसवून घरी जाण्यास सांगितले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जिथे असशील तिथे तुझा खून करू अशी धमकी दिली. यानंतर त्याला सतत फोन करून बाकीचे पैसे दे अन्यथा तुला ठार मारू अश्या धमक्या देण्यास सुरुवात केली. तरुणाने भीतीपोटी हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. मात्र त्याला सतत फोनवरून पैसे मागण्यासाठी धमक्या येऊ लागल्याने त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. यानंतर लागलीच बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतले आहे. आता त्याच्याकडे चौकशी सुरू असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.