बनावट सोनं तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दाऊदच्या हस्तकाला अटक

काठमांडू : वृत्तसंस्था – पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक अल्ताफ हुसैन अन्सारीला १५ किलो सोन्याच्या तस्करी प्रकरणी
नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पुढील चौकशीसाठी अन्सारीला काठमांडूला पाठवल्याची माहिती परसाचे डीएसपी मंजीत कुंवर यांनी दिली. याशिवाय एका भारतीय नागरिकालाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात काठमांडू रेंजचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्याम लाल ज्ञवली म्हणाले, अन्सारी हा मुख्य डीलर असून निलेश शकीय आणि संजय पटेल हे दोन भारतीय १५ किलो बनावट सोन्याच्या तस्करीचे मास्टरमाइंड आहेत. अन्सारी या दोघांना नेपाळमध्ये मदत करत होता. पोलिसांनी शकीयला एक दिवस आधीच अटक केली होती. तर, अन्सारी फरार होता. आता अन्सारी अटक करण्यात यश आले असून, पटेलला शोधण्याचे प्रयत्न सुरु आहे.

पुढं ज्ञवली यांनी म्हटले, हे सोने गुजरातमध्ये जाणार होते. चांदीवर सोन्याचा थर लावून हे तस्कर भारतात पाठवत. तिथे आरोपी खरे सोने असल्याचं सांगून विक्री करत. नेपाळमध्ये सोन्याने भरलेली बॅग फेकून देऊन आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. मग पोलिसांनी एक समिती स्थापन करुन या प्रकरणाची आणि भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु केली.

वरिष्ठ डीएसपी रंजन कुमार दहल यांनी केलेल्या चौकशीदरम्यान शिपाई बहादूर सिंग काद्यात आणि शिपाई प्रसन्न शेठ यांनी चुकीची माहिती सांगितली. तसेच तस्करीबद्दल पूर्ण माहिती दिली नसल्याचे समोर आले. या प्रकरणी आठ पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. भारतातील गुन्हेगारीत अन्सारीचा सहभाग असण्याची शक्यता ज्ञवली यांनी वर्तवली आहे. भारतीय बनावट चलनी नोटा प्रकरणी अन्सारीला २०१० मध्ये तीन वर्षाची शिक्षा झाली होती. अन्सारी हा आयएसआयच्या बनावट नोटा व सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा प्रमुख असल्याची माहिती सूत्रांनी दिली.