मुंबईत बनावट हॅन्ड सॅनिटायजरची फॅक्टरी, विक्री करताना पुण्यात तिघांना पकडलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईत बनावट हँड सॅनीटायझर्सच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पुण्यात हे बनावट हँड सॅनीटायझर्स विक्री करताना तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत ही कारवाई करण्यात आली आहे.
अजय शंकरलाल गांधी (वय 39, रा. शिवदर्शन चौक), मोहन वाघाराम चौधरी (वय 36, रा. शास्त्रीनगर, येरवडा) व सुरेश प्रेमजी छेडा (वय 39, रा. शनिवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दत्तावाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगभरात कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाकडून स्वच्छता राखण्यासोबतच मास्क लावण्यासोबतच नागरिकांनी सॅनीटायझर्सने दिवसातून काही वेळा हात साफ करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राज्यासह जगभरात सॅनीटायझर्स व मास्कची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. यानंतर चढ्या किंमतीने मास्क आणि सॅनीटायझर्सची विक्री करण्यात येत आहे.

दरम्यान, यामध्ये बनावटीकरण तसेच जादा किंमतीने विक्री होत असल्याचे समोर आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना सॅनीटायझर्स बनावट तयारकरून त्याची विक्री करण्यात येत असल्याचे माहिती मिळाली होती.

त्यानुसार, पोलिसांनी प्रथम अजय गांधी याला ताब्यात घेतले. त्याची चौकशीकरून घराची झडती घेतली असता त्याच्या घरात कोणतीही मान्यता व परवाने नसताना दर्जेदार सॅनीटायझरचे 5 लिटरचे दोन भरलेले कॅन मिळून आले. तर, एक मिकामे आणि छोट-छोठ्या बॉटल्स मिळाल्य आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर दोघांचे नाव मिळाले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

दरम्यान, या तिघांकडे चौकशी केल्यानंतर हे बनावट सॅनीटायझरर्स मुंबईतील साकीनाका भागात 90 फुटी रोडवर बनविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी येथे छापा टाकला त्यावेळी पोलिसांना येथे बनावट सॅनीटायझर तयार होणारा कारखानाच मिळून आला आहे. पोलिसांनी येथे छापा टाकला असून, त्यावर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी, डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, तुषार माळवदकर, सुभाष पिंगळे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघोले, सुधाकर माने, अशोक माने, योगेश जगताप, अमोल पवार, अजय थोरात यांच्या पथकाने केली आहे.

सॅनीटायझरर्स अत्यावश्यक वस्तूत समावेश
जगभरात कोरोना रोगाने थैमान घातल्यानंतर त्याच्यापासून बचावासाठी सॅनीटायझर्सने हात धुवण्यास सांगितले जात होते. तसेच, चेहर्‍याला मास्क लावण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत. त्यानंतर केंद्र सरकाने सॅनीटायझर्सची आवश्यक वस्तूमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात पोलिसांनी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा तसेच आवश्यक वस्तू अधिनियम कलम 3 सह 7 तसेच भादवि कमल 336, 276, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.