कुरकुंभ MIDC स्फोटाबाबत सोशल मीडियावर अफवेचे पीक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये स्फोट होऊन संपूर्ण पुणे-सोलापूर हायवे बंद करण्यात आला असल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर पसरवली जात आहे. या अफवेमुळे येथील परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये मात्र घबराट पसरली आहे.

आज सकाळपासूनच व्हाट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या विविध संदेशवाहक अ‍ॅपच्या माध्यमातून कुरकुंभ एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर हायवेवर असणारा पाटस टोल प्लाझा बंद करण्यात आला आहे. कुणीही तिकडे जाऊ नये अशा प्रकारच्या अफवेचे पीक आले आहे. याबाबत कुरकुंभ परिसरातील नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संपर्क साधला असता अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसून सर्व वाहतूक आणि व्यवहार सुरळीत चालले असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. याबाबत कुणीतरी मुद्दाम मागील काळात घडलेल्या घटनांचे जुने मेसेज पुन्हा ग्रुपवर टाकून अफवा पसरवत असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी कुरकुंभ एमआयडीसीमध्ये केमिकलचे स्फोटबाबत आलेले मेसेजमधील घटनांमध्ये कोणतेही वास्तव नाही, ही पूर्णपणे अफवा आहे आणि खोडसाळपणे हे मेसेज व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे या प्रकारचे मेसेज कुणीही पुढे फॉरवर्ड करू नये. या प्रकारचे मेसेज पाठवून कुणी अफवा पसरताना किंवा फॉरवर्ड करताना निदर्शनास आले तर तात्काळ कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/