सेवानिवृत्त पोलिसपुत्राचा बनावट नोटांचा कारखाना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – वंजारगल्लीतील झेरॉक्स दुकानात सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या पुत्राचा असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. पोलिसपुत्रच हे रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

झेरॉक्स दुकानात बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी मुकेश अशोक फंड (वय 40), संतोष प्रभाकर धिवर (वय 33, दोघे रा. वंजारगल्ली, नगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील एका आरोपीचे वडील सेवानिवृत्त रेल्वे पोलिस कर्मचारी आहेत. पोलिसपुत्रच शहराच्या मध्यवस्तीत बनावट नोटांचा कारखाना चालवत होता.

बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला आरोपी मुकेश फंड व संतोष धिवर या दोघांना शनिवारी (दि. 5) दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकारी अभियोक्ता क्रांती कुलकर्णी यांनी गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना मंगळवारपर्यंत (दि. 8) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

काय आहे प्रकरण

वंजारगल्लीत झेरॉक्स दुकानात बनावट नोटांची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यावरून पोलीस उपअधीक्षक मिटके यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक संपत शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सहाय्यक फौजदार राजेंद्र खोंडे, कर्मचारी रामदास सोनवणे, हेमंत खंडागळे, अभिजित आरकल आदींच्या पथकाने शुक्रवारी (दि. 4) रात्री वंजारगल्लीतील अभिषेक झेरॉक्स येथे छापा टाकला. तेथे बनावट नोटांची निर्मिती करीत असल्याचे आढळून आले. बाहेरून झेरॉक्स दुकान व आतून बनावट नोटांचा कारखाना असल्याचे दिसून आले.

दुकानात 2 हजार रुपयांच्या 20, पाचशेच्या 20, दोनशेच्या 3 असा एकूण 50 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे संगणकासह इतर 33 हजार 600 रुपयांचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवस्तीतील झेरॉस दुकानातच बनावट नोटांच्या निर्मितीचा प्रकारण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.