PM Cares Fund च्या नावानं तयार केल्या बनावट वेबसाईट, मुंबई-पुण्यासह इतर शहरांमधील 78 जणांवर FIR

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सायबरने लॉकडाऊनच्या काळात धडक कारवाई करत राज्यातील विविध शहरात ७८ गुन्ह्याची नोंद केली आहे. मुंबई, पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये अनेक ठिकाणी गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्हेगारांवर PM Cares Fund ची बनावट वेबसाइट तयार करून पैसा बळकावल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

दरम्यान लोकांना आता सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या लिंक पासून सावध राहण्यास महाराष्ट्र सायबर सेलने सल्ला दिला आहे. तसेच सायबर सेलने विनंती केली आहे की ज्यांना मदत म्हणून देणगी द्यायची असेल त्यांनी भारत सरकारच्या pmcares फंड करता देणगी देताना pmcares@sbi या अधिकृत लिंकचाच वापर करावा. काही बनावट लिंकद्वारे ऑनलाइन फसवणुक केली जात आहे, pmcare@sbi, pmcarefund@sbi, pmcares@pnb, pm.care@sbi, pmcaress@sbi, pncare@sbi ,pncares@sbi, pmcares@hdfc, pmcares@upi अशा प्रकारच्या खोट्या लिंक देऊन फसवणूक केली जात आहे. तरी सर्वांनी सावध राहावे असे आवाहन सायबर सेलने केले आहे. तसेच कोरोना संबंधित केंद्र सरकार व राज्य सरकारला सहकार्य करावे आणि जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना आणि नियमांचे पालन करावे आणि लॉकडाऊनच्या काळात घरीच थांबावे अशी विनंतीही सायबर सेलकडून करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनच्या काळात काही गुन्हेगार परिस्थितीचा गैरफायदा घेत असून महाराष्ट्र सायबर या गुन्हेगारांना आणि काही समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर काम करत आहे. सध्या महाराष्ट्र सायबर सेल फेसबुक, टिकटॉक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान या प्रकरणांत राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये जवळपास ७८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई ८, पुणे ग्रामीण ६, सातारा ६, नाशिक ग्रामीण ५, बीड ५, नाशिक शहर ४, ठाणे शहर ४, नागपूर शहर ४, कोल्हापूर ४, जळगाव ३, गोंदिया ३, भंडारा ३, सोलापूर ग्रामीण २, सिंधुदुर्ग २, पुणे शहर १ (N.C) या शहरांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश आहे.

दरम्यान मुंबई सायबर सेलने दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मालेगाव (जि.नाशिक) येथील तरुणाने फेसबुक पोस्ट मधून कोरोना विषाणू या साथीच्या आजारावर गैर भाष्य केले आणि या पोस्टला धार्मिक पद्धतीने वळण दिले. यामुळे परिसरातील आणि एकूणच देशातील वातावरण चिघळण्याची स्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अजून एक घटना ही डोंगरी (मुंबई) भागात घडली, येथे काही तरुण whatsapp द्वारे जाणूनबुजून अफवा पसरणविण्याचे मेसेज पाठवून संचारबंदीचे उल्लंघन करत होते, त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.