हेल्मेट कारवाई दरम्यान फुटले ‘बिंग’ ; ATS चा ‘तो’ तोतया PSI पोलीसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वारगेट परीसरात हेल्मेट कारवाई दरम्यान एका तोतया पोलीस उपनिरीक्षकाचे बिंग फुटले. या एटीएसच्या तोतया पोलीस उपनिरीक्षकाला स्वारगेट पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून एक बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आलं आहे. त्याच्यावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो आणि दहशतवादविरोधी पथक असं लिहिलेलं आहे.

विवेक रामराव खतोडे ( रा. सिंहगड रोड ) असे या तोतया पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून त्याच्या विरूद्ध स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी वाहतुक विभागाच्या पोलीस हवालदार तानाजी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या वाहतुक पोलिसांकडून हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यावेळी दत्तवाडी वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक सायकर व इतर कर्मचारी जोरदार हेल्मेट कारवाई करत होते. त्यावेळी सावरकर पुतळा येथे विवेक खतोडे याची गाडी अडविण्यात आली. त्यानंतर त्याला हेल्मेट नसल्याबाबत दंड भरण्यास सांगीतले. त्यावेळी त्याने आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले. मात्र वाहतूक पोलिसांना त्याचा संशय आल्यामुळे त्याच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्याचे बिंग फुटले.

यावेळी त्याच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले. त्यानुसार त्याच्यावर स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम करत आहेत.