पोलीस बनण्याचे स्वप्न पुर्ण न झाल्याने तरुणांना गंडा घालणाऱ्या तोतया पीएसआयला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस बनण्याचे स्वप्न पुर्ण न झाल्याने पोलिसांचा ड्रेस घालून व बनावट ओळखपत्र तयार करून तरुणांना नोकरीचे अमिष दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका तोतया पीएसआयला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

संजय उल्हास शिंदे असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरीच्या अमिषाने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. संजय शिंदे असं नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे आणि आपल्या मोठमोठ्या कंपनीत ओळखी असल्याचे सांगत नोकरीचे अमिष दाखून त्यांच्याकडून पैसे उकळले. तसेच राहणीमान आणि पोलीस उपनिरीक्षकाचे ओळखपत्र यामुळे त्याच्यावर सहज विश्वास ठेवला जात होता. तो आपल्या कारला पोलीस अशी पाटी लावून फिरायचा तसेच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलवत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना वर्णनाची कार लोणी टोल नाका पार करताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कार थांबवण्याचा इशारा केला. परंतु कार थांबली नाही. ती पुढे मोरेवस्ती कडे गेली. पोलिसांनी पाठलाग करून कार थांबविली. त्यावेळी कारमधील व्यक्ती आपण पीएसआय असल्याचे सांगू लागला. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्र मागितले. त्याने दाखविल्यावर ते बनावट असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक लोणारे यांनी ओळले. त्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचे शिक्षण १२ वी पर्यंत झालेले आहे. त्याने कोहिनूर इंस्टीट्युटमधून २०१४ साली मेकॅनिकल इंजिनियरींग केली. त्याला पोलीस व्हायचे होते. त्याला पोलीस गणवेशाचे प्रचंड आकर्षण होते. परंतु पोलीस व्हायचे स्वप्न पुर्ण न झाल्याने त्याने विमाननगर येथील इनॉर्बिट मॉलमध्ये नोकरी स्विकारली. मात्र पुण्यातील ऐशारामाची सवय लागल्याने पैशांची चणचण भासू लागल्याने लोकांना गंडविण्यास सुरुवात केली. त्याने एक पीएसआयचा गणवेश विकत घेऊन तो परिधान करत फोटो काढून बनावट ओळखपत्र तयार केले. त्यानंतर बेरोजगार तरुणांना नोकरीच्या अमिषाने लुटण्याची शक्कल लढविली. त्याने अशा प्रकारे पुण्यातील व पुण्याबाहेरील अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर सहा महिन्यांपुर्वी तळवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, हमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, चव्हाण, कर्मचारी राजेश नवले, बजरंग धायगुडे, अनिल कुसाळकर, अमित कांबळे, शहिद शेख, ज्ञानेश्वर चित्ते यांच्या पथकाने केली.