भामटा Raw Agent सातारा पोलिसांच्या जाळ्यात, असा झाला पर्दाफाश

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – रॉचा एजंट असल्याचा बढाया मारणा-या आणि पोलिसांची वर्दी घालून रत्यावरून स्पोर्टस बाईकने फिरणा-या एका भामट्या तरुणाला सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसाची वर्दी जप्त केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

नयन राजेंद्र घोरपडे (वय 23 मूळ रा. गवडी, जि. सातारा, सध्या रा. शनिवार पेठ, सातारा ) असे अटक केेलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सातारा डीबी पथकाचे पोलीस हवालदार सुजित भोसले यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने आपल्या गावात आणि साताऱ्यात अनेकाजवळ पण रॉचा एजंट असल्याच्या बढाया मारल्या असल्याची माहितीही समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 11) दुपारी 4 च्या सुमारास आरोपी सातारा- कास या रस्त्यावरून स्पोर्ट बाईकने जात होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील होता. यावेळी आरोपीने पोलिसांची वर्दी परिधान केली होती. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांनी आरोपीला थांबवून आपण कोणत्या ठाण्यात सेवेत आहात अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपीने आपण रॉ चा एजंट असून दिल्लीत कार्यरत असल्याची खोटी माहिती दिली. यावेळी पोलिसांना त्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या पोलिसी खाक्या आणि प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर संबंधित तरुणाच पितळं उघडं पडलं आहे. पोलिसांनी घटनेची माहिती पोलीस निरिक्षक सजन हंकारे यांना दिली. हंकारे यांनी संबंधित तरुणाला पोलीस ठाण्यात घेवून येण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.