महानगरपालिकेच्या तोतया सुरक्षा रक्षकास अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

नागरिकांना फसवण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या तोतयास वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पाचपीर चौक, काळेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास झाली. संदेश रामचंद्र जाधव (२१, रा. तानाजी नढे चाळ, काळेवाडी गावठाण) याला अटक केली आहे. तर पोलीस कर्मचारी शाम बाबा यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेवाडी येथे एक जण मी पालिकेचा सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगत असून तो संशयित वाटत असल्याची माहिती शाम बाबा यांना मिळाली. त्यानुसार पाचपीर चौकात जाऊन संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. पायात काळ्या रंगाचा बूट, खाकी रंगाचा शर्ट, खाकी रंगाची टोपी, एक लाल रंगाची हातात काठी आणि बॅग आढळून आली. पोलिसानी बॅग तपासली असता त्यामध्ये संदेश जाधव नावाची नेम।प्लेट, चार स्टार, दोन पीसीएमसी बॅच, एक खाकी रंगाची लाईन यार्ड लोकसेवक वापरतो तसे ओळखीचे चिन्ह आढळून आले. त्यामुळे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. तपास वाकड पोलीस करत आहेत.