‘ते’ TikTok अ‍ॅप ‘बोगस’, लिंकवर क्लिक करू नका, अन्यथा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारत-चीन सैन्यामध्ये गलवाल खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने 59 चीनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे. सरकारने बंदी घातलेल्या टीकटॉकसह चिनी अ‍ॅपची मोबाइल धारकांमधील प्रसिद्धी पाहता आता या अ‍ॅपच्या नामसाधर्म्याचे बनावट अ‍ॅप तयार होऊ लागले आहे. टिकटॉक प्रो अ‍ॅप या नावाने मोबाइलधारकांना संदेश पाठवण्यात येत आहेत. यामधील लिंकवर जाऊन अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. मात्र, अशा लिंकवर क्लिक करु नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.

टिकटॉक अ‍ॅप मोबाइलधारकांमध्ये खूपच प्रसिद्ध अ‍ॅप आहे. सरकारने या अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतरही इंटरनेटवर या अ‍ॅपचा शोध घेण्यात येत असल्याचे समोर आले आहे. लोकांची मागणी लक्षात घेता टिकटॉक प्रो अ‍ॅपच्या नावाने एक मेसेज पाठवण्यात येत असल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या संदेशातील लिंकवर क्लिक केल्यास आपल्या मोबाइलमधील डेटा चोरीला जाण्याची तसेच मोबाइल बँक खात्याशी जोडलेला असल्यास बँक तपशिलाचाही गैरवापर होण्याची भीती आहे. त्यामुळे अशा लिंकवर क्लिक करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत महाराष्ट्र सायबरने 524 गुन्हे दाखल केले असून सर्वाधिक 54 गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आक्षेपार्ह संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्या प्रकरणी 119, फेसबुक पोस्ट शेअर केल्या प्रकरणी 220, टिकटॉक व्हिडीओ शेअर केल्या प्रकरणी 28, ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट करणे 12 तर इस्टाग्रामवरील पोस्ट प्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
TikTok बंदीमुळे कंपनीला 45 हजार कोटींचा फटका

भारतात शॉर्ट व्हिडीओ मेकिंग अ‍ॅप टिकटॉकवर बंदी घातल्याने त्याची पॅरंट कंपनी बाईट डान्सला कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. चायनीज मीडिया ऑर्गनायझेशन ग्लोबल टाईम्सकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर बाईट डान्सला 45 कोटींचा फटका बसल्याचे सांगण्या आले आहे.

भारतात TikTok सर्वाधिक प्रसिद्ध
कंपनीचे हे अ‍ॅप खास करून भारतात खूप प्रसिद्ध झाले होते. भारतात थेट ग्रामीण भागापर्यंत हे अ‍ॅप पोहचले होते. टिकटॉक भारतात 66 कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आले होते. मात्र, सध्या टिकटॉकला प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोरवरून हटवण्यात आले आहे. त्यामुळे बाईट डान्सला अॅवर जाहिरात दाखवण्यासाठी जो पैसा मिळत होता. तो आता बंद झाला आहे.