Pune News : बनावट टोल पावतीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 जणांना अटक; खेड-शिवापूर टोल नाक्यावरील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली बंधनकारक केली असतानाही खेड-शिवापूर टोल नाक्यावर मात्र बनावट टोल पावतीचे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.

सुदेश प्रकाश गंगावणे (वय 25 वर्षे रा. वाई), अक्षय तानाजी सणस (वय 22, रा. वाई नागेवाडी (ता. वाई), शुभम सिताराम डोलारे (वय 19, रा. जनता वसाहत, पुणे) , साई लादूराम सुतार, (वय 25 वर्षे रा. दत्तनगर कात्रज पुणे), हेमंत भाटे, दादा दळवी, सतीश मरगजे, असे अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अभिजित वसंत बाबर यांनी राजगड पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान या प्रकरणी पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबर यांनी 16 फेब्रुवारी रोजी साताऱ्याला जाताना खेड-शिवापूर टोलनाका आणि आणेवाडी टोलनाक्यावर टोलचे पैसे भरून पावती घेतली. मात्र या दोन्ही टोलनाक्यावरील पावत्यांमध्ये तफावत असल्याने त्या पावत्या बनावट असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी हा प्रकार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि स्थानिक गुन्हे शाखांना सांगितला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाबर यांच्यासोबत खेड-शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्यावर येऊन सत्यता पडताळणी केली. त्यावेळी त्या पावत्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर याप्रकरणी सात जणांवर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनय देशमुख आणि अप्पर अधीक्षक मिलींद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.