वर्दी घालून मास्क लावून नकली पोलिस बनत केली ‘वसुली’!

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था –  मध्य प्रदेश राज्यामधील रतलाम जिल्ह्यातून एक विचित्र अशी घटना उघडकीस आली आहे. येथे एक महिला पोलिस बनून तेथील लोकांकडून पैसे वसुली करत होती. महिला मास्क घालून कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांना घाबरवून आणि धमकावून त्यांच्याकडून पैसे वसूल करत होती. तर ह्या महिलेचा कारनामा दुसऱ्या एका महिलेने उघडकीस आणला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रतलाम येथे एक विवाहित महिला नकली पोलिस बनली. ती महू रोडवरील एसटी स्टॅंडवर पोलिसांची वर्दी घालून, मास्क लावून गेले काही दिवसांपासून दुकानदार आणि बसमध्ये चढत असलेल्या प्रवाशांकडून वसुली करत होती. एक दिवस अचानक या महिला पोलिसावर एका फळ विक्रेत्या महिलेला संशय आला होता. त्या महिलेने याची माहिती पोलिसाला दिली. त्यानंतर या महिलेला पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं.

दरम्यान, पोलिसांच्या हाती लागल्यावर तिने सांगितले, की ती जावरा येथील पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. तिने तिचं नाव निकीता सांगितलं. या महिलेची सध्या चौकशी सुरू आहे. तसेच महापालिकेच्या चालान कापणाऱ्या टीमच्या कर्मचाऱ्यांसोबत ही महिला मागील ५ ते ६ दिवसांपासून मास्क लावून लोकांकडून पैसे वसूल करत होती. संधी मिळताच लोकांकडून अवैध वसुलीही करत होती, असे सांगण्यात आले आहे.