Coronavirus : आईस्क्रीम खाल्ल्यानं पसरतोय कोरोना ? सरकारनं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूशी संबंधित अनेक अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच आईस्क्रीम बाबतची एक अफवा व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, कोविड -१९ हा आइस्क्रीम आणि थंड पदार्थांच्या सेवनामुळे पसरतो. दरम्यान हा दावा सरकारने पूर्णपणे नाकारला आहे. पीआयबीनेही याबद्दल ट्वीट करून म्हटले आहे की, “जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टपणे म्हटले आहे की या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.”

हे दावेही नाकारले
डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की, ‘सूप किंवा इतर पदार्थांमध्ये काळीमिरी टाकणे कोविड -१९ ला प्रतिबंधित किंवा ठीक करत नाही’. यापूर्वी, डब्ल्यूएचओने देखील हे स्पष्ट केले होते की, कोरोनो विषाणू माश्यांद्वारे पसरत नाही आणि सूर्यप्रकाशाने किंवा शरीरावर जंतुनाशक फवारणीने बरे करता येत नाही. डास चावल्याने कोरोना होतो या अफवांनाही संघटनेने फेटाळून लावले आहे. या व्यतिरिक्त हे देखील स्पष्ट केले आहे की गरम पाण्याने किंवा उच्च तापमानासह आंघोळ केल्यामुळे कोरोना विषाणूचा नाश होत नाही.

देशात 33 हजारांहून अधिक संक्रमित प्रकरणे
कोरोना विषाणूच्या बाबतीत, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी सकाळी सांगितले की, भारतात कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३३,०५० झाली आहे. तर साथीने आतापर्यंत १०७४ लोकांचा बळी घेतला आहे. तर ८३२५ लोकांनी या आजारावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 1718 नवीन घटना घडल्या आहेत, तर 67 लोकांचा मृत्यू झाला आहे.