खंडणी वसुलीसाठी बलात्काराचा खोटा गुन्हा ! मुख्य सूत्रधार सागर सूर्यवंशी फरार, सहभागी महिलांचा पोलिसांकडून शोध सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्यासाठी बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. पोलिसांनी व्यावसायिकावर लागलेल्या आरोपातून आता क्लीन चिट दिली आहे. फायनल ब समरी पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या समरीत, पुराव्याअभावी आरोपपत्र दाखल केले गेले नसल्याचं नमूद केलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सध्या फरार आहे. याशिवाय या प्रकरणातील महिलांचाही शोध घेतला जात आहे.

अ‍ॅड. सागर राजभाऊ सूर्यवंशी आणि त्याच्या या कटात सामिल असणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनीष मिलानी (रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयानं सूर्यवंशी यांचा जामीन फेटाळला आहे. मिलानी हे बांधकाम व्यावसायिक आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथे मिलानी यांची 50 एकर जागा आहे. त्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. न्यायालयात या जागेचा वाद सुरू आहे. हा खटला चालवण्यासाठी वकील फरारी असताना आरोपीनं काही महिलांना हाताशी धरून मिलानी यांच्याविरुद्ध भिवंडी आणि वाई येथे बलात्काराचे विविध गुन्हे दाखल केले. पोलीस तपासात हे गुन्हे खोटे असल्याचं सिद्ध झालं आहे. मोबाईल टॉवर लोकेशन आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास केला. भिवंडी न्यायालयात पोलिसांनी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांना याबाबत प्रतिवेदन करून ब समरी फायनल होण्याची विनंती केली आहे.

मिलानी यांनी वकील सागर सूर्यवंशी याची वकील म्हणून नियुक्ती केली होती. सूर्यवंशीनं त्या जागेत हिस्सा मागण्यास सुरुवात केली. त्यामुळं फिर्यादी मिलानी यांनी त्याच्याकडून खटला काढून घेतला. यानंतर खवळलेल्या सूर्यवंशीनं खोट्या तक्रारी दाखल करत दबाव आणण्यास सुरुवात केली. परंतु मिलानी यांनी कायद्यानं लढा दिला.

पोलिसांनी तपास करत आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले. यानंतर त्याचा जामीन सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत फेटाळण्यात आला.

You might also like