धक्कादायक ! CM ठाकरे यांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी नाशिक मधील ‘त्या’ सुपर क्लास 1 अधिकाऱ्यावर गुन्हा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, अशातही नाशिकच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देउन गंडविले आहे. कोरोनाच्या काळात खोटी माहिती दिल्यामुळे नाशिकमध्ये जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिवरीष्ठ अधिकार्‍यावर गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावर मात करण्यासाठी ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व जनतेला आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी आणि कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते.

’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात काम करत असताना शिंदेवर हलगर्जी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रवींद्र शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये खोटी आकडेवारी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राजपत्रीत वर्ग 1 च्या अधिकार्‍याविरुद्ध,आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बाबूगिरी करणार्‍या अधिकार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.