दुर्देवी ! कोरोनामुक्त झाल्यानंतर देखील 50 जणांना कुटुंबानं नाकारलं, पुन्हा हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसशी लढा त्यांनी जिंकला. आता आपण आपल्या घरी पुन्हा जाणार याची उत्सुकता त्यांना होती. मोठ्या आशेने आपल्याला कुणीतरी न्यायाला येईल याची ते वाट पाहत होते. मात्र कुणीच आले नाही. कुटुंबाने त्यांना नाकारल्याने बरे झाल्यानंतरही पुन्हा कोरोना रुग्णालयात दाखल होण्याची वेळ या रुग्णांवर ओढावली. 50 पेक्षा अधिक कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना त्यांचे कुटुंब पुन्हा स्वीकारण्यास तयार झाले नाहीत.

रुग्णालयात कोरोनावर उपचार घेऊन बर्‍या झालेल्या 93 वर्षांच्या आजी  मुलगा न्यायला येईल याची वाट पाहत आहेत. त्यांच्यासारखे अनेक जण डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयाच्या गेटवर आपल्या नातेवाईकांची वाट पाहून थकले आणि पुन्हा रुग्णालयात आले. आता जायचं तरी कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे ते पुन्हा रुग्णालयात दाखल झाले.

दहा ते पंधरा दिवस उपचार घेऊन बरे झाल्यानंतर या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालय प्रशासनाकडून या रुग्णांच्या कुटुंबाला वारंवार फोन केले जात आहेत. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया येत नाही.

गांधी हॉस्पिटलमधील नोडल ऑफिसर डॉ. प्रभाकर राव यांनी सांगितले, हे सर्व रुग्ण आता चांगले आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणे नाहीत. आम्ही त्यांना डिस्चार्ज दिला आहे आणि ते होम क्वारंटाइनसाठी ते फिट असल्याचे सांगितले असूनही त्यांचे कुटुंब त्यांना घरी नेण्यास तयार नाही.

रुग्णांच्या कुटुंबांनी त्यांना घरी नेण्यापूर्वी टेस्ट रिपोर्ट नेगेटिव्ह आहे ते दाखवा अशी मागणी केल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. मात्र आयसीएमआरच्या गाइडलाइन्सनुसार लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांची लक्षणंही पूर्णपणे बरी झाली, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर डिस्चार्जपूर्वी त्यांच्या टेस्ट करण्याची गरज नाही.