भाजपाने ‘त्या’ कुटुंबांनाही दिले मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ३० मे रोजी होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील तसेच देशाबाहेरील मान्यवर व्यक्तींना निमंत्रीत करण्यात आले आहे. त्यासोबतच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक काळातील हिंसाचारात बळी पडलेल्या ५० पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना देखील भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळयाचे निमंत्रण पाठवले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार पश्चिम बंगालमध्ये मागच्या सहा वर्षात पंचायत निवडणुकांपासून ते आताच संपलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ५१ भाजपा कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुरुवारी होणाऱ्या भव्य शपथविधी सोहळयाला परदेशी नेत्यांसह अनेक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित रहाणार आहेत.

मिदानपूरमधील दिवंगत भाजपा कार्यकर्ते मनू हंसदा यांचा मुलगा म्हणाला की, माझ्या वडिलांची तृणमुलच्या गुंडांनी हत्या केली होती. आम्हाला आता शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले असून आम्ही दिल्लीला जातोय त्याचा आनंद आहे. आता आमच्या भागात शांतता आहे असे त्याने सांगितले.