Coronavirus : ‘कोरोना’मुळं दगावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू होत असून मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एखादा पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी कोरोनाने दगावल्यास त्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्याच्या कुटुंबीयांना शासकीय निवासस्थानात अधिकृतपणे राहता येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना आपला जीव गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या डोक्यावरील छताची चिंता करू नये, असं सांगतानाच कोविड 19 मुळे मृत्यू पावलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानात राहता येईल, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारने माणुसकीच्या नात्याने हा निर्णय घेतला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या बदल्यात आपण कमीतकमी हे करू शकू. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असताना 4288 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 3239 जण पूर्णत: बरे झाले आहेत, ही आनंददायक बाब आहे, परंतु 51 जणांचा बळी देखील गेला आहे ही दुर्दैवी बाब आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

गेल्या 24 तासात मुंबई पोलीस दलातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात 54 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 38 पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण कोरोना बाधित पोलिसांपैकी 3 हजार 239 पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत तर 991 पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई पोलीस दलात कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे, असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

पोलिसांसाठी वरळी पोलीस कॅम्पमध्ये 100 खाटांचे कोव्हिड सेंटर उभं करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार केले जाणार आहेत. वरळी भागात मोठ्या प्रमाणात पोलीस वसाहत आहे. या वसाहतीमध्येही आतापर्यंत अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलिसांमधील वाढता कोरोनाचा संसर्ग ही पोलीस कुटुंबीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत.