मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत ! ‘या’ कुटुंबानं मुलीचं नाव ठेवलं ‘नागरिकता’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत देखील नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झालं. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे. या विधेयकाला संपूर्ण देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही राज्यांमधून या विधेयकाचे स्वागत होताना दिसत आहे तर काही राज्यांमधून या विधेयकाला विरोध होताना दिसत आहे.

काही जणांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या घटनात्मकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर काहींनी हे विधेयक धर्माच्या आधारावर भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. काही ठिकाणी तर या विधेयकाच्या विरोधात आंदोलने पुकारले असून या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाडांनी ठाणे येथे जोरदार विरोध दर्शवत आंदोलन पुकारले होते.

बाहेरील देशातून भारतात वास्तव्यास असणाऱ्या अनेक लोकांनी या विधेयकाचे स्वागत केले असून यापैकी पाकिस्तानमधून भारतात आलेले एक हिंदू कुटुंब, नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यामुळे खुश झाले आहे. हे कुटूंब २०११ मध्ये पाकिस्तानातून भारतात आले होते. परंतु त्यांना भारताचे नागरिकत्व मिळत नव्हते. या कुटुंबात दोन लहान बाळ यांचाही समावेश असून यात मोठं बाळ २ वर्षाचे असून लहान बाळ केवळ ६ महिन्यांचे आहे.

अशात त्या लहान बाळाचं बारसं अजून झालेलं नसल्याने नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर त्या बाळाचं बारसं करण्यात आले आहे. आणि या बाळाचं नाव ‘नागरिकता’ असे ठेवण्यात आले आहे. आपल्या बाळाचं भविष्य या विधेयकावर अवलंबून आहे असे बाळाच्या आजीने सांगितले. आणि हे विधेयक मंजूर झाल्याने आमच्या कुटुंबाला भारताचं नागरिकत्व मिळेल आणि या अनुषंगानेच बाळाचं नाव ‘नागरिकता’ ठेवले असल्याचे त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून हे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी विधेयक मंजूर झाल्यानंतर सर्व खासदारांचे त्यांनी आभार देखील मानले. “गेल्या कित्येक वर्षांपासून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा लोकांचं दु:ख या विधेयकामुळे दूर होईल,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान या विधेयकामुळे देशातील अनेक लोक नाराज असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. हे विधेयक कितपर्यंत फायद्याचे ठरते हे येणाऱ्या काळात पुढे येईलच.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/