ओमान देशात झालेल्या ढगफुटीत माजलगावमधील कुटुंब बेपत्ता ; माजलगावात पसरली शोककळा

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय ओमान देशात झालेल्या ढगफुटीत बेपत्ता झाले आहेत शनिवारी (18 मे) रोजी ही घटना घडली.ओमान देशातील मस्कत या ठिकाणी ही घटना घडली आहे.

खैरउल्ला खान (52) हे माजलगाव येथील बुखारी शाळेतील माजी शिक्षक आहेत. खान आपल्या पत्नीसह ओमान देशात मस्कत येथे ‘आय बी अल हैथम मेडिकल सेंटर’ येथे नोकरीस असलेल्या मुलाला भेटायला गेले होते. मुलगा सरदार खान यास भेटण्यासाठी ते 6 मे रोजी माजलगाव येथून गेले होते. शनिवारी ते आपला मुलगा सरदार, सून व तीन नातवंडे, चार वर्षीय मुलगी, दोन वर्षे मुलगा, 22 दिवसांचा एक मुलगा अशी सर्व मिळून एका कारमध्ये बाहेर फिरायला गेले होते. पर्यटन स्थळ असलेल्या ‘वादी बीन खालिद’ येथे जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वारे सुरु झाले आणि ढगफुटी झाली.

परिस्थिती पाहण्यासाठी त्यांचा मुलगा कारमधून बाहेर आला मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि यात कार वाहून गेली. कारमध्ये असलेली खान व त्यांची पत्नी ,सून नातवंडे यांचा शोध स्थानिक प्रशासन घेत आहे. खैरूला खान (52), शबाना खान खैरूला खान (48), सून अरशी खान सरदार खान (28) , नात शिदरा (4), नातु जहेद (2) व नु (22 दिवस) अशी त्यांची नावं आहेत. खाली उतरलेला सरदार एका झाडाला धरून राहिल्याने तो या दुर्घटनेतून वाचला आहे. काही क्षणातच जोरदार धुके पसरून मोठा पाऊस झाला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होऊन हा परिसर जलमय झाला. या घटनेमुळे माजलगावात शोककळा पसरली आहे.