IB कॉन्स्टेबल अंकित शर्माच्या कुटूंबियांनी जारी केला Video , सरकारकडे केली ‘ही’ मागणी (व्हिडीओ)

दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून ईशान्य दिल्लीमध्ये सीएएवरून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. हिंसाचारात दंगेखोरांनी आयबी अधिकाऱ्याचा खून करून मृतदेह एका नाल्यात फेकून दिल्याचे समोर आले. आयबी कॉन्स्टेबलचा मृतदेह चांद बाग पुलावरील नाल्यातून काढण्यात आला होता. अंकित शर्माच्या कुटुंबीयांनी नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून या मध्ये त्यांनी मुलाला शहीदचा दर्जा मिळावा अशी मागणी सरकारकडे केली आहे.

अंकित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे आई – वडील आणि भाऊ हात जोडून अंकितला शहीदाचा दर्जा मिळावा अशी मागणी करत आहेत. अंकितचा भाऊ अंकुर शर्माने सांगितले की, दिल्ली सरकारकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही. त्यांची वागणूक योग्य नसल्याचे अंकुर यांनी म्हटले आहे. सध्या अंकित शर्मा यांचे कुटुंबीय त्यांच्या गावी आहेत.

दिल्ली हिंसाचारात मारले गेलेले आयबीचे अधिकारी अंकित शर्मा यांचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये अंकित शर्मा यांच्या शरीरावर चाकूने वार केले असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. अंकित यांच्या पोटात आणि छातीत चाकूने वार केल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण शरीरावर चाकूने अनेक वार करण्यात आले आहेत. अतिशय निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आली.